
महाराष्ट्राची सणयात्रा
पुरातन काळापासून भारतीय भूखंडावर सह्याद्री पर्वत रंगांच्या सावलीत आणि दक्खन च्या पठारावर एक प्रांत बहरत गेला, फुलत गेला. अनेक शतकांच्या अस्थिरतेनंतर एक विकसनशील तरीही परंपरेशी नाळ जोडलेले राज्य म्हणून स्थापलेला हा मराठी प्रांत म्हणजेच आपला महाराष्ट्र. तब्ब्ल १८ शतके जुनी परंपरा आणि १५ शतके जुनी प्रगत लेखी आणि बोली भाषा असलेल्या ह्या प्रांतातल्या प्रत्येक गोष्टीला शास्त्रोक्त आधार आहे. संस्कारांचा पाया खोल आणि घट्ट रुजलेल्या ह्या प्रांतात अनेक पारंपरिक सण जन्माला आले आणि आज मोठ्या दिमाखात ते सर्वदूर साजरे केले जातात. ऋतुचक्रावर आधारलेल्या आपल्या पंचांगात ह्या सणांना अनन्यसाधारण महत्व आहे.
पौराणिक, ऐतिहासिक तसेच समकालीन अशा सर्व सणांवर आधारित एक दृकश्राव्य माहिती-मनोरंजन कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत.
“महाराष्ट्राची सणयात्रा”
कालच्या संस्कारांना आजच्या तांत्रिक माध्यमाद्वारे उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचविणारी सुखद यात्रा.
अनेक शतकांपूर्वी जन्म झालेले आपले सण सहस्त्रक बदलल्यानंतर सुद्धा का टिकून आहेत आणि ते आजच्या काळात का साजरे केले पाहिजेत ह्याचे महत्व ह्या कार्यक्रमाद्वारे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
स्वरांश एंटरटेंमेंट निर्मित व प्रभा एंटरप्राइजेस संयोजित- महाराष्ट्रची सणयात्रा आपल्याला भगवान राम-कृष्ण, ज्ञानोबा-तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक कालखंडांची सैर करून त्या कालखंडाशी आणि परंपरेशी एकरूप करते. ही यात्रा निसर्गाचे महत्व सांगते तसेच स्त्रीपूजेचे. बळीराजाच्या कष्टाचे तसेच योद्ध्यांच्या पराक्रमाचे वर्णन यात सापडते. संतवाङमयाचे गांभीर्य ह्यात आहे तसेच नवकवींचा गोडवा. संपूर्ण महाराष्ट्राची विविधता तिथल्या परिवेशातून, पाककृतींमधून आणि राहणीमनातून दाखविणारी ही यात्रा महाराष्ट्राचे ऐक्य दाखवायला मात्र विसरत नाही. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मराठी सणांवर आधारित सुमधुर गाणी, नेत्रदीपक नृत्य, माहितीपर संहिता, आणि ह्या सगळ्या धाग्याची एक सुरेल वीण असलेलं नाट्यमय सूत्र-संचलन.
नूतन वर्षारंभ म्हणजे गुढी पाडव्यापासून सुरु होणारी ही यात्रा, पुढे रामनवमी, अक्षय्य तृतिया, मंगळागौर, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, शिवजयंती ते अगदी महिला दिन अशा व इतर अनेक सण-समारंभांना स्पर्श करत महाराष्ट्राचे नखशिखांत दर्शन घडवून आणते. गाण्यांना आणि सणांना अनुसरून केलेले पोशाख, कार्यक्रमाला साजेशी रंगमंच सजावट आपल्याला केवळ कार्यक्रमाच्या कालावधीपुरते नाही तर पुढे देखील त्या भावविश्वात रमवून ठेवते.
आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचे गौरवगान गाऊन ही यात्रा आपल्या पदरात कृतज्ञतेची ओटी व भविष्यवादाचा प्रसाद देऊन सुफलसंपूर्ण होते.



